टाटांनी दिले पंचतारांकित हॉटेल्स

Foto
जीवाची पर्वा न करता कोरोना पॉझिटिव रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर्स आणि परिचारिकांना प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी राहण्यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाण्यात मंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोरोना योद्ध्यांची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये केली. औरंगाबादेत मात्र माणुसकीशून्य प्रकार घडत आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात राहणार्‍या डॉक्टर्स आणि परिचारिकांना बाहेर काढण्याचा चंग केंद्राच्या प्राचार्यांनी बांधला असून याबाबत नोटीसही जारी केली आहे.
सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात राहणार्‍या डॉक्टर आणि नर्सेसना बाहेर काढण्याचा चंगच  प्राचार्य डॉ. सुधाकर शेळके यांनी बांधला आहे. कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना घरी जाण्याची परवानगी नसते. त्यासाठी त्यांची वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येते. जिल्हा रुग्णालयात तसेच इतरत्र कोरोना वार्डात काम करणार्‍या जवळपास 15 ते 20 परिचारिका आणि आठ-दहा डॉक्टरांची सिडकोतील आरोग्य कुटुंब कल्याण व प्रशिक्षण केंद्रात व्यवस्था केलेली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून परिचारिका तसेच डॉक्टर येथे राहतात. कुटुंबापासून दूर अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम करणार्‍या या कर्मचार्‍यांवर असतील त्याची तलवार कायमच आहे.  गेल्या तीन महिन्यात केंद्राचे प्राचार्य डॉ. सुधाकर शेळके यांनी दोन ते तीन वेळेस केंद्र खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. कोरोना संकटाच्या काळात सध्या तरी या प्रशिक्षण केंद्रात कोणत्याच प्रकारचे प्रशिक्षण सुरू नसताना प्राचार्यांना कर्मचार्‍यांना हुसकून लावण्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राहण्याचे मागितले भाडे!
परिचारिका आणि डॉक्टर राहत असलेल्या खोल्यांचे नियमानुसार भाडे द्यावे, अशी मागणी प्राचार्यांनी जिल्हा  शल्यचिकित्सकांकडे केली होती. तब्बल दोन लाखाहून अधिक भाडे तातडीने भरावे अशी नोटीस काढली. मात्र न्यायालयाने याबाबत सुमोटो दाखल करून घेत या प्रकारावर रोख लावला होता. तब्बल महिना महिनाभर कुटुंबीयांची भेटही न घेता धोकादायक परिस्थितीत काम करणार्‍या डॉक्टर आणि परिचारिकांना प्राचार्यांच्या वागण्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.